मनित्यManitya
तुकाराम गाथा · page 16 of 16

अभंग ४५०१–४५८३

Abhangas 4501–4583 (the Gāthā is numbered 1–4,583), in the original Marathi, with the Gāthā's own section headings — as transcribed on Marathi Wikisource, whose base edition is not named. The refrain (ध्रु.) is set in a warmer colour. One font error is not yet repaired: where you see इप, read ई (होइप = होई).

↵

लीलाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥

मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनियां करी स्तनपान ॥२॥

नभाचा ही साक्षी पाताळापरता । कुर्वाळिते माता हातें त्यासि ॥३॥

हातें कुर्वाळुनी मुखीं घाली घांस । पुरे ह्मणे तीस पोट धालें ॥४॥

पोट धालें मग देतसे ढेंकर । भक्तीचें तें फार तुळसीदळ ॥५॥

तुळसीदळ भावें सहित देवापाणी । फार त्याहुनि क्षीरसागरा ॥६॥

क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भक्तीचें तें जळ गोड देवा ॥७॥

देवा भक्त जिवाहुनि आवडती । सकळ हि प्रीति त्यांच्याठायीं ॥८॥

त्यांचा हा अंकित सर्व भावें हरि । तुका ह्मणे करी सर्व काज ॥९॥

जयेवेळीं चोरूनियां नेलीं वत्सें । तयालागीं तैसें होणें लागे ॥१॥

लागे दोहीं ठायी करावें पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥

माय जाल्यावरी अवघ्या वत्सांची । घरीं वत्सें जीचीं तैसा जाला ॥३॥

जाला तैसा जैसे घरिंचे गोपाळ । आणिक सकळ मोहरी पांवे ॥४॥

मोहरी पांवे सिंगें वाहिल्या काहाळा । देखिला सोहाळा ब्रह्मादिकीं ॥५॥

ब्रह्मांदिकां सुख स्वपनीं ही नाहीं । तैसें दोहीं ठायीं वोसंडलें ॥६॥

वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी । जैसी ज्याची आई तैसा जाला ॥७॥

लाघव कळलें ब्रह्मयासी याचें । परब्रह्म साचें अवतरलें ॥८॥

तरले हे जन सकळ ही आतां । ऐसें तो विधाता बोलियेला ॥९॥

लागला हे स्तुती करूं अनंताची । चतुर्मुख वाची भक्ती स्तोत्रें ॥१०॥

भक्तिकाजें देवें केला अवतार। पृथ्वीचा भार फेडावया ॥११॥

पृथिवी दाटीली होती या असुरीं । नासाहावे वरीभार तये ॥१२॥

तया काकुलती आपल्या दासांची । तयालागीं वेची सर्वस्व ही ॥१३॥

स्वहित दासांचें करावयालागीं । अव्यक्त हें जगीं व्यक्ती आलें ॥१४॥

लेखा कोण करी यांचिया पुण्याचा । जयांसवें वाचा बोले हरी ॥१५॥

हरी नाममात्रें पातकांच्या रासी । तो आला घरासि गौळियांच्या ॥१६॥

गौळिये अवघीं जालीं कृष्णमय । नामें लोकत्रय तरतील ॥१७॥

तरतील नामें कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यांपाशीं होइल पाप ॥१८॥

पाप ऐसें नाहीं कृष्णनामें राहे । धन्य तो चि पाहे कृष्णमुख ॥१९॥

मुख माझें काय जो मी वणूप पार । मग नमस्कार घाली ब्रह्मा ॥२०॥

ब्रह्मा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासि हा चि देव ॥२१॥

देव चि अवगा जालासे सकळ । गाई हा गोपाळ वत्सें तेथें ॥२२॥

तेथें पाहाणें जें आणीक दुसरें । मूर्ख त्या अंतरें दुजा नाहीं ॥२३॥

दुजा भाव तुका ह्मणे जया चित्ती । रवरव भोगिती कुंभपाक ॥२४॥

कुंभपाक लागे तयासि भोगणें । अवघा चि नेणे देव ऐसा ॥१॥

देव ऐसा ठावा नाहीं जया जना । तयासि यातना यमकरी ॥२॥

कळला हा देव तया साच खरा । गाई वत्सें घरा धाडी ब्रह्मा ॥३॥

ब्रह्मादिकां ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥४॥

जाणवेल देव गौळियांच्या भावें । तुका ह्मणे सेवे संचित हें ॥५॥

संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणे वांयां परि त्याचें ॥१॥

त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाईवरी आणिक गाई ॥२॥

गाई दवडुनि घालिती बाहेरी । तंव ह्मणे हरि बांधा त्या ही ॥३॥

त्याही तुह्मी बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वाड्यांतुनि ॥४॥

पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥५॥

नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ॥६॥

मेलीं हीं शाहाणीं करितां सायास । नाहीं सुखलेश तुका ह्मणे ॥७॥

तुका ह्मणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळीं करुनि ध्वजा ॥१॥

करूनियां टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥२॥

दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद । गीत गातां छंद ताल नाहीं ॥३॥

नाही ताळ गातां नाचतां गोपाळां । घननीळ सावळा तयामध्यें ॥४॥

मधीं जयां हरि तें सुख आगळें । देहभाव काळें नाहीं तयां ॥५॥

तयांसि आळंगी आपुलिया करीं । जाती भूमीवरी लोटांगणीं ॥६॥

निजभाव देखे जयांचिये अंगीं । तुका ह्मणे संगीं क्रीडे तयां ॥७॥

तयांसवें करी काला दहींभात । सिदो†या अनंत मेळवुनी ॥१॥

मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागें पुढें कांहीं उरों नेदी ॥२॥

नेदी चोरी करूं जाणे अंतरींचें । आपलें हीं साचें द्यावें तेथें ॥३॥

द्यावा दहींभात आपले प्रकार । तयांचा वेव्हार सांडवावा ॥४॥

वांटी सकळांसि हातें आपुलिया । जैसें मागे तया तैसें द्यावें ॥५॥

द्यावें सांभाळुनी सम तुकभावें । आपण हि खावें त्यांचें तुक ॥६॥

तुक सकळांचे गोविंदाचे हातीं । कोण कोणे गति भला बुरा ॥७॥

राखे त्यासि तैसें आपलाल्या भावें । विचारुनि द्यावें जैसें तैसें ॥८॥

तैसें सुख नाहीं वैकुंठींच्या लोकां । तें दिलें भाविकां गोपाळांसि ॥९॥

गोपाळांचे मुखीं देउनी कवळ । घांस माखे लाळ खाय त्यांची ॥१०॥

त्यांचिये मुखींचे काढूनियां घांस। झोंबतां हातांस खाय बळें ॥११॥

बळें जयाचिया ठेंगणें सकळ । तयातें गोपाळ पाडितील ॥१२॥

पाठी उचलूनि वाहातील खांदीं । नाचतील मांदीं मेळवुनी ॥१३॥

मांदीं मेळवुनी धणी दिली आह्मां। तुका ह्मणे जमा केल्या गाई ॥१४॥

केला पुढें हरि अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले ॥१॥

थाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥२॥

सोयी लागलिया तयांची अनंती । न बोलवितां येती मागें तया ॥३॥

तयांचिये चित्तीं बैसला अनंत । घेती नित्यनित्य तें चि सुख ॥४॥

सुख नाहीं कोणा हरिच्या वियोगें । तुका ह्मणे जुगें घडी जाय ॥५॥

जाय फाकोनियां निवडितां गाई । आपलाल्या सोयी घराचिये ॥१॥

घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापे ॥२॥

गोविंदे वेधिलें तुका ह्मणे मन । वियोगें ही ध्यान संयोगाचें ॥३॥

संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥

गोपाळ गुणाचा ह्मणे गुणमय । निंबलोण माये उतरिलें ॥२॥

उतरूनि हातें धरि हनूवठी । ओवाळूनि दिठी सांडियेली ॥३॥

दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भक्तिचिया सुखा गोडावला ॥४॥

लहान हा थोर जीवजंत भूतें । आपण दैवतें जाला देवी ॥५॥

देवी ह्मैसासुर मुंजिया खेचर । लहान हि थोर देव हरि ॥६॥

हरि तुका ह्मणे अवघा एकला । परि या धाकुला भक्तासाटीं ॥७॥

भक्तीसाटीं केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥१॥

देव गिळुनियां धरिलें मोहन । माय ह्मणे कोण येथें दुजें ॥२॥

दुजें येथें कोणी नाहीं कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥३॥

देवापाशीं पुसे देव काय जाला । हांसें आलें बोला याचें हरि ॥४॥

यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिकें मानिती साच खरें ॥५॥

लटिकें तें साच साच तें लटिके । नेणती लोभिकें आशाबद्ध ॥६॥

सांग ह्मणे माय येरु वासी तोंड । तंव तें ब्रह्मांड देखे माजी ॥७॥

माजी जया चंद्र सूर्य तारांगणें । तो भक्तांकारणें बाळलीला ॥८॥

लीळा कोण जाणे याचें महिमान । जगाचें जीवन देवादिदेव ॥९॥

देवें कवतुक दाखविलें तयां । लागतील पायां मायबापें ॥१०॥

मायबाप ह्मणे हा चि देव खरा । आणीक पसारा लटिका तो ॥११॥

तो हि त्यांचा देव दिला नारायणें । माझें हें करणें तो हि मी च ॥१२॥

मीं च ह्मणउनि जें जें जेथें ध्याती । तेथें मी श्रीपति भोगिता तें ॥१३॥

तें मज वेगळें मी तया निराळा । नाहीं या सकळा ब्रह्मांडांत ॥१४॥

ततभावना तैसें भविष्य तयाचें । फळ देता साचें मी च एक ॥१५॥

मी च एक खरा बोलें नारायण । दाविलें निर्वाण निजदासां ॥१६॥

निजदासां खूण दाविली निरुती । तुका ह्मणे भूतीं नारायण ॥१७॥

नारायण भूतीं न कळे जयांसि । होय गर्भवासीं येणें जाणें ॥१॥

येणें जाणें होय भूतांच्या मत्सरें । न कळतां खरें देव ऐसा ॥२॥

देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ द्वेषबुद्धि ॥३॥

बुद्धीचा पालट नव्हे कोणे काळीं । हरि जळीं स्थळीं तया चित्तीं ॥४॥

चित्त तें निर्मळ जैसें नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥५॥

तयामाजी हरि जाणिजे त्या भावें । आपलें परावें सारिखें चि ॥६॥

चिंतनें तयाच्या तरती आणीक । जो हें सकिळक देव देखे ॥७॥

देव देखे तो ही कसा देव नव्हे । उरला संदेहे काय त्यासि ॥८॥

काया वाचा मनें पूजावे वैष्णव । ह्मणउनि भाव धरूनियां ॥९॥

यांसि कवतुक दाखविलें रानीं । वोणवा गिळूनि गोपाळांसि ॥१०॥

गोपाळांसि डोळे झांकविले हातें । धरिलें अनंतें विश्वरूप ॥११॥

पसरूनि मुख गिळियेलें ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥१२॥

संधि सारूनियां पाहिलें अनंता । ह्मणती ते आतां कळलांसी ॥१३॥

कळला हा तुझा देह नव्हे देवा । गिळिला वोणवा आणीक तो ॥१४॥

तो तयां कळला आरुषां गोपाळां । दुर्गम सकळां साधनांसि ॥१५॥

सीण उरे तुका ह्मणे साधनाचा । भाविकांसि साचा भाव दावी ॥१६॥

भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥१॥

सांगे गोपाळांसि काय पुण्य होतें । वांचलों जळते आगी हातीं ॥२॥

आजि आह्मां येथें राखियेलें देवें । नाहीं तरी जीवें न वंचतों ॥३॥

न वंचत्या गाई जळतों सकळें । पूर्वपुण्यबळें वांचविलें ॥४॥

पूर्वपुण्य होतें तुमचिये गांठी । बोले जगजेठी गोपाळांसि ॥५॥

गोपाळांसि ह्मणे वैकुंठनायक । भले तुह्मी एक पुण्यवंत ॥६॥

करी तुका ह्मणे करवी आपण । द्यावें थोरपण सेवकांसि ॥७॥

काय आह्मां चाळविसी वायांविण । ह्मणसी दुरून देखिलासि ॥१॥

लावूनियां डोळे नव्हतों दुश्चित । तुज परचित्त माव होती ॥२॥

होती दृष्टि आंत उघडी आमची । बाहेरी ते वांयां चि कुंची झाकुं ॥३॥

जालासि थोरला थोरल्या तोंडाचा । गिळियेला वाचा धूर आगी ॥४॥

आगी खातो ऐसा आमचा सांगाती । आनंदें नाचती भोंवताली ॥५॥

भोंवतीं आपणा मेळविलीं देवें । तुका ह्मणे ठावें नाहीं ज्ञान ॥६॥

नाहीं त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥१॥

जाणतियां सवें येऊं नेदी हरि । तर्कवादी दुरी दुराविले ॥२॥

वादियासि भेद निंदा अहंकार । देऊनियां दूर दुराविले ॥३॥

दुरावले दूर आशाबद्ध देवा । करितां या सवा कुटुंबाची ॥४॥

चित्तीं द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥५॥

नरक साधिले विसरोनि देवा । बुडाले ते भवा नदीमाजी ॥६॥

जीहीं हरिसंग केला संवसारीं । तुका ह्मणे खरी खेप त्यांची ॥७॥

खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥१॥

मातेपाशीं एक नवल सांगती । जाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥

ओवाळिलें तिनें करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसि ॥३॥

पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥४॥

कवतुका कानीं आइकतां त्यांचे । बोलतां ये वाचे वीट नये ॥५॥

नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥६॥

तेव्हां कवतुक कळों आलें कांहीं । हळुहळु दोहीं मायबापां ॥७॥

हळुहळु त्यांचें पुण्य जालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें ॥८॥

तिमिर हें तेथें राहों शके कैसें । जालियां प्रकाशें गोविंदाच्या ॥९॥

दावी तुका ह्मणे देव ज्या आपणा । पालटे तें क्षणामाजी एका ॥१०॥

काय आतां यासि ह्मणावें लेंकरूं । जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥

माया याची यासि राहिली व्यापून । कळों नये क्षण एक होतां ॥२॥

क्षण एक होतां विसरलीं त्यासि । माझेंमाझें ऐसें करी बाळा ॥३॥

करी कवतुक कळों नेदी कोणा । योजूनि कारणा तें चि खेळे ॥४॥

तें सुख लुटिलें घरिचिया घरीं । तुका ह्मणे परी आपुलाल्या ॥५॥

आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥१॥

खेळु मांडियेला यमुने पाबळीं । या रे चेंडुफळी खेळूं आतां ॥२॥

आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनिया वांटी गडिया गडी ॥३॥

गडी जंव पाहे आपणासमान । नाहीं नारायण ह्मणे दुजा ॥४॥

जाणोनि गोविंदें सकळांचा भाव । तयांसि उपाव तो चि सांगे ॥५॥

सांगे सकळांसि व्हा रे एकीकडे । चेंडू राखा गडे तुह्मी माझा ॥६॥

मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुतीं हाल माझी ॥७॥

माझे हाके हाक मेळवा सकळ । नव जा बरळ एकमेकां ॥८॥

एका समतुकें अवघेचि राहा । जाईल तो पाहा धरा चेंडू ॥९॥

चेंडू धरा ऐसें सांगतो सकळां । आपण निराळा एकला चि ॥१०॥

चिंडुनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकिळक पाहात चि ॥११॥

पाहात चि ठेलीं न चलतां कांहीं । येरू लवलाहीं ह्मणे धरा ॥१२॥

धरावा तयानें त्याचें बळ ज्यासि। येरा आणिकांसि लाग नव्हे ॥१३॥

नव्हे काम बळ बुद्धि नाहीं त्याचें । न धरवे निंचें उंचाविण ॥१४॥

विचारीं पडिले देखिले गोपाळ । या ह्मणे सकळ मजमागें ॥१५॥

मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥

चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय लाग पाहोनियां ॥१७॥

या मागें जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठायां ॥१८॥

पंथ जे चुकले आपले मतीचे । तयांमागें त्यांचे ते चि हाल ॥१९॥

हाल दोघां एक मोहरां मागिलां । चालतां चुकलां वाट पंथ ॥२०॥

पंथ पुढिलांसी चालतां न कळे । मागिलांनीं डोळे उघडावे ॥२१॥

वयाचा प्रबोध विचार ज्या नाहीं । समान तो देहीं बाळकांसी ॥२२॥

सिकविलें हित नायिके जो कानीं । त्यामागें भल्यांनीं जाऊं नये ॥२३॥

नये तें चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तो चि खरा ॥२४॥

रानभरी जाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥२५॥

लाज सांडूनियां मारितील हाका । कळलें नायका वैकुंठींच्या ॥२६॥

चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची ॥२७॥

गोपाळांचा धांवा आइकिला कानीं । सोयी चक्रपाणि पालविलें ॥२८॥

साया धरूनियां आले हरिपासीं । लहान थोरांसी सांभाळिलें ॥२९॥

सांभाळिलें तुका ह्मणे सकळ हि । सुखी जाले ते ही हरिमुखें ॥३०॥

मुखें सांगे त्यांसि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥१॥

माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥२॥

जळांत पाहातां हाडति या दृष्टि । ह्मणे जगजेठी ऐसें नव्हे ॥३॥

नव्हे साच चेंडू छाया दिसे आंत । खरा तेथें चित्त लावा वरी ॥४॥

वरी देखियेला अवघ्यांनीं डोळां । ह्मणती गोपाळा आतां कैसें ॥५॥

कैसें करूनियां उतरावा खालीं । देखोनियां भ्यालीं अवघीं डोहो ॥६॥

डोहो बहु खोल काळया भीतरी । सरलीं माघारीं अवघीं जणें ॥७॥

जयाचें कारण तयासी च ठावें । पुसे त्याच्या भावें त्यास हरि ॥८॥

त्यासि नारायण ह्मणे राहा तळीं । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥

वरि जातां वरि पाहाती गोपाळ । ह्मणति सकळ आह्मी नेणों ॥१०॥

नेणों ह्मणती हें करितोसि काई। आह्मां तुझी आई देइल सिव्या ॥११॥

आपुलिया कानां देउनियां हात । सकळीं निमित्य टाळियेलें ॥१२॥

निमित्याकारणें रचिलें कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥

खांदीवरी पाव ठेवियेला देवें । पाडावा त्या भावें चेंडू तळीं ॥१४॥

तळील नेणती तुका ह्मणे भाव । अंतरींचा देव जाणों नेदी ॥१५॥

नेदी कळों केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥१॥

न पुरेसा हात घाली चेंडूकडे । ह्मणीतलें गडे सांभाळावें ॥२॥

सांभाळ करितां सकळां जिवांचा । गोपाळांसि वाचा ह्मणे बरें ॥३॥

बरें विचारुनी करावें कारण । ह्मणे नारायण ब†या बरें ॥४॥

बरें ह्मणउनि तयांकडे पाहे । सोडविला जाय चेंडू तळा ॥५॥

तयासवें उडी घातली अनंतें । गोपाळ रडते येती घरा ॥६॥

येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरीं सकळ आलीं पुढें ॥७॥

पुसतील मात आपआपल्यासि । हरिदुःखें त्यांसी न बोलवे ॥८॥

न बोलवे हरि बुडालासें मुखें । कुटितील दुःखें उर माथे ॥९॥

मायबापें तुका ह्मणे न देखती । ऐसें दुःख चित्तीं गोपाळांच्या ॥१०॥

गोपाळां उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा जाली त्यांची ॥१॥

जालें काय ऐसें न कळे कोणासी । ह्मणती तुह्मांपासीं देव होता ॥२॥

देवासवें दुःख न पवते ऐसें । कांहीं अनारिसें दिसे आजी ॥३॥

आजि दिसे हरि फांकला यांपाशीं । ह्मणउनि ऐशी परि जाली ॥४॥

जाणविल्याविण कैसें कळे त्यांसि। शाहाणे तयांसि कळों आले ॥५॥

कळों आलें तीहीं काुंफ्द शांत केला । ठायींचा च त्यांला थोडा होता ॥६॥

होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शाहाणा होता त्याणें ॥७॥

सांगे आतां हरि तुह्मां आह्मां नाहीं । बुडाला तो डोहीं यमुनेच्या ॥८॥

यासी अवकाश नव्हे चि पुसतां । जालिया अनंता कोण परि ॥९॥

परि त्या दुःखाची काय सांगों आतां । तुका ह्मणे माता लोकपाळ ॥१०॥

पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां ॥१॥

काय ऐसें पाप होतें आह्मांपासीं । बोलती एकासी एक एका ॥२॥

एकांचिये डोळां असुं बाह्यात्कारी । नाहीं तीं अंतरीं जळतील ॥३॥

जळतील एकें अंतर्बाह्यात्कारें । टाकिलीं लेकुरें कडियेहूनि ॥४॥

निवांत चि एकें राहिलीं नििंश्चत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ॥५॥

त्यांचे जीव वरी आले त्या सकळां । एका त्या गोपाळांवांचूनियां ॥६॥

वांचणें तें आतां खोटें संवसारीं । नव्हे भेटी जरी हरिसवें ॥७॥

सवें घेऊनियां चालली गोपाळां । अवघीं च बाळा नर नारी ॥८॥

नर नारी नाहीं मनुष्याचें नावें । गोकुळ हें गांव सांडियेलें ॥९॥

सांडियेलीं अन्नें संपदा सकळ । चित्तीं तो गोपाळ धरुनि जाती ॥१०॥

तिरीं माना घालूनियां उभ्या गाई । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ॥११॥

यमुनेच्या तिरीं झाडें वृक्ष वल्ली। दुःखें कोमाइलीं कृष्णाचिया ॥१२॥

यांचें त्यांचें दुःख एक जालें तिरीं । मग शोक करी मायबाप ॥१३॥

मायबाप तुका ह्मणे सहोदर । तोंवरी च तीर न पवतां ॥१४॥

तीर देखोनियां यमुनेचें जळ । कांठीं च कोल्हाळ करिताती ॥१॥

कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासि ओढी भय मागें ॥२॥

मागें सरे माय पाउला पाउलीं । आपल्या च घाली धाकें अंग ॥३॥

अंग राखोनियां माय खेद करी । अंतरीचें हरी जाणवलें ॥४॥

जाणवलें मग देवें दिली बुडी । तुका ह्मणे कुडी भावना हे ॥५॥

भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भयें पोटीं ॥१॥

पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥२॥

न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥३॥

अंतरला बहु बोलतां वाउगें । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥४॥

गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोण्याभावें रडती तीं ॥५॥

तीं गेलीं घरास आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥६॥

मायबापांची तों ऐसी जाली गति । तुका ह्मणे अंतीं कळों आलें ॥७॥

आला यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणांसाठीं होता ॥१॥

होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥२॥

आधीं पाठीमोरीं जालीं तीं सकळें । मग या गोपाळें बुडी दिली ॥३॥

दिली हाक त्याणें जाऊनि पाताळा । जागविलें काळा भुजंगासि ॥४॥

भुजंग हा होता निजला मंदिरीं । निर्भर अंतरीं गर्वनिधि ॥५॥

गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचें ॥६॥

चेंडुवाचे मिसें काळया नाथावा । तुका ह्मणे देवा कारण हें ॥७॥

काळयाचे मागे चेंडु पत्नीपाशीं । तेजःपुंज राशी देखियेला ॥१॥

लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥

उघवला खांब कर्दळीचा गाभा । ब्रीदें वांकी नभा देखे पायीं ॥३॥

पाहिला सकळ तिनें न्याहाळूनि । कोण या जननी विसंबली ॥४॥

विसरु हा तीस कैसा याचा जाला । जीवाहुनि वाल्हा दिसतसे ॥५॥

दिसतसे रूप गोजिरें लाहान । पाहातां लोचन सुखावले ॥६॥

पाहिलें पताौनि काळा दुष्टाकडे । मग ह्मणे कुडें जालें आतां ॥७॥

आतां हा उठोनि खाईल या बाळा । देईल वेल्हाळा माय जीव ॥८॥

जीव याचा कैसा वांचे ह्मणे नारी । मोहिली अंतरीं हरिरूपें ॥९॥

रूपे अनंताचीं अनंतप्रकार । न कळे साचार तुका ह्मणे ॥१०॥

ह्मणे चेंडू कोणें आणिला या ठाया । आलों पुरवाया कोड त्याचें ॥१॥

त्याचें आइकोन निष्ठ‍ वचन । भयाभीत मन जालें तीचें ॥२॥

तिची चित्तवृत्ती होती देवावरी । आधीं ते माघारी फिरली वेगीं ॥३॥

वेगीं मन गेलें भ्रताराचे सोयी । विघ्न आलें कांहीं आह्मांवरीं ॥४॥

वरि उदकास अंत नाहीं पार । अक्षोभ सागर भरलासे ॥५॥

संचार करूनि कोण्या वाटे आला । ठायीं च देखिला अवचिता ॥६॥

अवचिता नेणों येथें उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥७॥

मोठ्यानें बोलतो भय नाहीं मनीं । केला उठवूनी काळ जागा ॥८॥

जागविला काळसर्प तये वेळीं । उठिला कल्लोळीं विषाचिये ॥९॥

यमुनेच्या डोहावरी आला ऊत । काऑयाकृतांतधूदकारें ॥१०॥

कारणें ज्या येथें आला नारायण । जालें दरुषण दोघांमधीं ॥११॥

दोघांमध्यें जाले बोल परस्परें । प्रसंग उत्तरें युद्धाचिया ॥१२॥

चिंतावला चित्तीं तोंडे बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥१३॥

जाला सावकाश झेंप घाली वरी। तंव ह्मणे हरि मुष्टिघातें ॥१४॥

तेणें काळें त्यासि दिसे काळ तैसा। हरावया जैसा जीव जाला ॥१५॥

आठवले काळा हाकारिलें गोत । मिळालीं बहुतें नागकुळें ॥१६॥

कल्हारीं संधानीं धरियेला हरि । अवघा विखारीं व्यापियेला ॥१७॥

यांस तुका ह्मणे नाहीं भक्तीविण । गरुडाचें चिंतन केलें मनीं ॥१८॥

निजदास उभा तात्काळ पायापें । स्वामी देखे सर्पें वेष्टियेला ॥१॥

लहानथोरें होतीं मिळालीं अपारें । त्याच्या धुदकारें निवारिलीं ॥२॥

निघतां आपटी धरूनि धांवामधीं । एकाचें चि वधी माथें पायें ॥३॥

एकीं जीव दिले येतां च त्या धाकें । येतील तीं एकें काकूलती ॥४॥

यथेष्ट भिक्षलीं पोट धाये वरी । तंव ह्मणे हरि पुरे आतां ॥५॥

आतां करूं काम आलों जयासाटीं । हरी घाली मिठी काळयासि ॥६॥

यासि नाथूनियां नाकीं दिली दोरी । चेंडू भार शिरीं कमळांचा ॥७॥

चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगुन बहुडविलें ॥८॥

विसरु न पडे संवगड्या गाई । यमुनेच्या डोहीं लक्ष त्यांचें ॥९॥

त्याच्या गोष्टी कांठीं बैसोनि सांगती । बुडाला दाविती येथें हरि ॥१०॥

हरीचें चिंतन करितां आठव । तुका ह्मणे देव आला वरी ॥११॥

अवचित त्यांणीं देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥१॥

आला घेऊनियां यमुनेबाहेरी । पालवितो करीं गडियांसि ॥२॥

गडियांसि ह्मणे वैकुंठनायक । या रे सकिळक मजपाशीं ॥३॥

मजपाशीं तुह्मां भय काय करी । जविळ या दुरी जाऊं नका ॥४॥

कानीं आइकिले गोविंदाचे बोल । ह्मणती नवल चला पाहों ॥५॥

पाहों आले हरीजवळ सकळ । गोविंदें गोपाळ आिंळगिले ॥६॥

आल्या गाई वरी घालितील माना । वोरसलें स्तना क्षीर लोटें ॥७॥

लोटती सकळें एकावरी एक । होउनि पृथक कुर्वाळलीं ॥८॥

कुर्वाळलीं आनंदें घेती चारापाणी । तिहीं चक्रपाणी देखियेला ॥९॥

त्यां च पाशीं होता परि केली माव । न कळे संदेह पडलिया ॥१०॥

याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया । त्यांसि कृष्णें काया दिव्य दिली ॥११॥

दिलें गोविंदें त्या पदा नाहीं नाश। तुका ह्मणे आस निरसली ॥१२॥

आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥

पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥

हाका आरोळिया देउनि नाचती । एक सादाविती हरि आले ॥३॥

आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥

लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा । रूप वेळोवेळां आठविती ॥५॥

आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥६॥

आधीं चुकी मग घडे आठवण । तुका ह्मणे जन परिचयें ॥७॥

जननी हे ह्मणे आहा काय जालें । शरीर रिक्षलें काय काजें ॥१॥

काय काज आतां हरिविण जिणें । नित्य दुःख कोणें सोसावें हें ॥२॥

हें दुःख न सरे हरि न भेटे तों । त्यामागें चि जातों एका वेळे ॥३॥

एकवेळ जरी देखतें मी आतां । तरी जीवापरता न करितें ॥४॥

करितां हे मात हरीचें चिंतन । शुभ तो शकुन तुका ह्मणे ॥५॥

शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥१॥

आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषें मात ॥२॥

हरुषलीं माता केलें निंबलोण । गोपाळांवरून कुरवंडी ॥३॥

गोपाळां भोवतें मिळालें गोकुळ । अवघीं सकळ लहान थोरें ॥४॥

थोर सुख जालें ते काळीं आनंद । सांगती गोविंद वरि आला ॥५॥

आले वरि बैसोनियां नारायण । काळया नाथून वहन केलें ॥६॥

नगराबाहेरी निघाले आनंदें । लावूनियां वाद्यें नाना घोष ॥७॥

नारायणापुढें गोपाळ चालती । आनंदें नाचती गाती गीत ॥८॥

तंव तो देखिला वैकुंठींचा पती । लोटांगणीं जाती सकळ ही ॥९॥

सकळ ही एका भावें आलिंगिले । अवघियां जाले अवघे हरि ॥१०॥

हरि आलिंगनें हरिरूप जालीं । आप विसरलीं आपणास ॥११॥

सकळांसी सुख एक दिलें देवें । मायबापां भावें लोकपाळां ॥१२॥

मायबाप देवा नाहीं लोकपाळ । सारिखीं सकळ तुका ह्मणे ॥१३॥

नेणें वर्ण धर्म जीं आलीं सामोरीं । अवघीं च हरी आिंळगिलीं ॥१॥

हरि लोकपाळ आले नगरांत । सकळांसहित मायबाप ॥२॥

पारणें तयांचें जालें एका वेळे । देखिलें सावळें परब्रह्म ॥३॥

ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती । गुढिया उभविती घरोघरीं ॥४॥

घरोघरीं सुख आनंद सोहळा । सडे रंग माळा चौकदारीं ॥५॥

दारीं वृंदावनें तुळसीचीं वनें । रामकृष्णगाणें नारायण ॥६॥

नारायण तिहीं पूजिला बहुतीं । नाना पुष्पयाती करूनियां ॥७॥

यांचें ॠण नाहीं फिटलें मागील । पुढें भांडवल जोडिती हीं ॥८॥

हीं नव्हतीं कधीं या देवा वेगळीं । केला वनमाळी सेवाॠणी ॥९॥

सेवाॠणें तुका ह्मणे रूपधारी । भक्तांचा कैवारी नारायणा ॥१०॥

नारायण आले निजमंदिरासि । जाले या लोकांसि बहुडविते ॥१॥

बहुडविले बहु केलें समाधान । विसरु तो क्षण नका माझा ॥२॥

मात सांगितली सकळ वृत्तांत । केलें दंडवत सकळांनीं ॥३॥

सकळां भातुकें वांटिल्या साखरा । आपलाल्या घरा लोक गेले ॥४॥

लोक गेले कामा गाईपें गोपाळ । वारली सकळ लोभापाठी ॥५॥

लोभ दावुनियां आपला विसर । पाडितो कुमर धनआशा ॥६॥

आशेचे बांधले तुका ह्मणे जन । काय नारायण ऐसा जाणे ॥७॥

जाला कवतुक करितां रोकडें । आणीक ही पुढें नारायण ॥१॥

येउनियां पुढें धरिला मारग । हरावया भाग इंद्रापाशीं ॥२॥

इंद्रा दहीं दुध तूप नेतां लोणी । घेतलें हिरोनि वाटे त्यांचें ॥३॥

हिरोनि घेतल्या कावडी सकळा । ह्मणती गोपाळा बरें नव्हे ॥४॥

नव्हे तें चि करी न भे किळकाळा । तुका ह्मणे लीळा खेळे देव ॥५॥

खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव ह्मणे तयां भेऊं नका ॥१॥

नका धरू भय धाक कांहीं मनीं । बोले चक्रपाणि गौळियांसि ॥२॥

गौळियांसि धीर नाहीं या वचनें । आशंकितमनें वेडावलीं ॥३॥

वेडावलीं त्यांसि न कळतां भाव । देवआदिदेव नोळखतां ॥४॥

नोळखतां दुःखें वाहाती शरीरीं । तुका ह्मणे वरि भारवाही ॥५॥

भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥१॥

अंगसंगें तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥

मागुती पडती चिंतेचिये डोहीं । जयाची हे नाहीं बुद्धि िस्थर ॥३॥

बुद्धि िस्थर होउं नेदी नारायण । आशबद्ध जन लोभिकांची ॥४॥

लोभिकां न साहे देवाचें करणें । तुका ह्मणे तेणें दुःखी होती ॥५॥

दुःखी होती लोभें करावें तें काई । उडतील गाई म्हैसी आतां ॥१॥

आणीकही कांहीं होईल अरिष्ट । नायिके हा धीट सांगितलें ॥२॥

सांगों चला याच्या मायबापांपाशीं । निघाले घरासि देवा रागें ॥३॥

रागें काला देतां न घेती कवळ । टोकवी गोपाळ क्रोधियांसि ॥४॥

क्रोध देवावरि धरियेला राग । तुका ह्मणे भाग न लभती ॥५॥

भाग त्या सुखाचे वांकड्यां बोबड्यां । आपलिया गड्यां भाविकांसि ॥१॥

भारवाही गेले टाकुनि कावडी । नवनीतगोडी भाविकांसि ॥२॥

काला करूनियां वांटिलां सकळां । आनंदें गोपाळांमाजी खेळे ॥३॥

खेळेंमेळें दहीं दुध तूप खाती । भय नाहीं चित्तीं कवणाचें ॥४॥

कवणाचें चाले तुका ह्मणे बळ । जयासी गोपाळ साह्य जाला ॥५॥

जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥

तातडिया मेघां आज्ञा करी राव । गोकुळींचा ठाव उरों नेदा ॥२॥

नेदाविया काई म्हसी वांचों लोक । पुरा सकिळक सिळाधारीं ॥३॥

धाक नाहीं माझा गोविळयां पोरां । सकिळक मारा ह्मणे मेघां ॥४॥

ह्मणविती देव आपणां तोंवरी । जंव नाहीं वरी कोपलों मी ॥५॥

मीपणें हा देव न कळे चि त्यांसी । अभिमानें रासि गर्वाचिया ॥६॥

अभिमानरासि जयाचिये ठायीं । तुका ह्मणे तइप देव दुरी ॥७॥

देव त्यां फावला गोपाळां । नाहीं तेथें कळा अभिमान ॥१॥

नाडलीं आपल्या आपण चि एकें । संदेहदायकें बहुफारें ॥२॥

फारें चाळविलीं नेदी कळों माव । देवाआदिदेव विश्वंभर ॥३॥

विश्वासावांचुनि कळों नये खरा । अभक्तां अधीरा जैसा तैसा ॥४॥

जैसा भाव तैसा जविळ त्या दुरि । तुका ह्मणे हरि देतो घेतो ॥५॥

तो या साच भावें न कळे चि इंद्रा । ह्मणउनि धारा घाली सिळा ॥१॥

घाली धारा मेघ कडाडिला माथा । वरि अवचिता देखियेला ॥२॥

देखती पाऊस वोळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥३॥

विचार पडला विसरले खेळ । अन्याय गोपाळ ह्मणती केला ॥४॥

लागलेंसे गोड न कळे ते काळीं । भेणें वनमाळी आठविती ॥५॥

आतां कायकैसा करावा विचार । गोधनासि थार आपणिया ॥६॥

यांचिया विचारें होणार ते काई । तुका ह्मणे ठायीं वेडावलीं ॥७॥

वेडावलीं काय करावें या काळीं । ह्मणे वनमाळी गोपाळांसि ॥१॥

शिरी धरूं गोवर्द्धन उचलूनि । ह्मणे तुह्मी कोणी भिऊं नका ॥२॥

नका सांडूं कोणी आपला आवांका । मारितां या हाका आरोळिया ॥३॥

अशंकित चित्तें न वटे त्यां खरें । धाकें च ते बरें ह्मणती चला ॥४॥

चित्ती धाक परि जवळी अनंत । तुका ह्मणे घात होऊं नेदी ॥५॥

नेदी दुःख देखों दासा नारायण । ठेवी निवारून आल्या आधीं ॥१॥

आधीं पुढें शुद्ध करावा मारग । दासांमागें मग सुखरूप ॥२॥

पर्वतासि हात लाविला अनंतें । तो जाय वरतें आपेंआप ॥३॥

आपल्याआपण उचलिला गिरी । गोपाळ हे करी निमित्यासि ॥४॥

निमित्य करूनि करावें कारण । करितां आपण कळों नेदी ॥५॥

दिनाचा कृपाळु पतितपावन । हें करी वचन सांच खरें ॥६॥

सांगणें न लगे सुखदुःख दासा । तुका ह्मणे ऐसा कृपावंत ॥७॥

कृपावंतें हाक दिली सकिळकां । माजिया रे नका राहों कोणी ॥१॥

निघाले या भेणे पाउसाच्या जन । देखे गोवर्द्धन उचलिला ॥२॥

लाविले गोपाळ फेरीं चहूंकडे । हांसे काुंफ्दे रडे कोणी धाकें ॥३॥

धाकें हीं सकळ निघालीं भीतरी । उचलिला गिरी तयाखालीं ॥४॥

तयाखालीं गाई वत्सें आलीं लोक । पक्षी सकिळक जीवजाति ॥५॥

जिहीं ह्मणविलें हरीचे अंकित । जातीचे ते होत कोणी तरी ॥६॥

जाति कुळ नाहीं तयासि प्रमाण । अनन्या अनन्य तुका ह्मणे ॥७॥

त्यांसि राखे बळें आपुले जे दास । किळकाळासि वास पाहों नेदी ।1॥

पाउस न येतां केली यांची थार । लागला तुषार येऊं मग ॥२॥

येउनि दगड बैसतील गिरी । वरुषला धारीं शिळांचिये ॥३॥

शिळांचिये धारीं वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरें ॥४॥

एक सरें गिरि धरिला गोपाळीं । होतों भाव बळी आह्मी ऐसे ॥५॥

ऐसें कळों आलें देवाचिया चित्ता । ह्मणे तुह्मीं आतां हात सोडा ॥६॥

हांसती गोपाळ करूनि नवल । आइकोनि बोल गोविंदाचे ॥७॥

दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलितां ॥८॥

भार आह्मांवरि घालुनि निराळा । राहिलासी डोळा चुकवुनि ॥९॥

निमित्य अंगुळी लावियेली बरी । पाहों कैसा गिरी धरितोसि ॥१०॥

सिणले हे होते ठायींच्या त्या भारें । लटिकें चि खरें मानुनियां ॥११॥

यांणीं अंत पाहों आदरिला याचा । तुका ह्मणे वाचा वाचाळ ते ॥१२॥

वाचाळ लटिके अभक्त जे खळ । आपुलें तें बळ वाखाणीती ॥१॥

बळें हुंबरती सत्य त्यां न कळे । नुघडती डोळे अंधऑयांचे ॥२॥

आसुडिल्या माना हात पाय नेटें । तंव भार बोटें उचलिला ॥३॥

लटिका चि आह्मीं सीण केला देवा । कळों आलें तेव्हां सकळांसि ॥४॥

आलें कळों तुका ह्मणे अनुभवें । मग अहंभावें सांडवलीं ॥५॥

सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं ॥१॥

लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण ह्मणे भलें ॥२॥

भला आजि तुह्मी केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥३॥

लागती चरणा सकळ ते काळीं । आह्मांमध्यें बळी तूं चि एक ॥४॥

एका तुजविण न यों आह्मी कामा । कळों कृष्णा रामा आलें आजी ॥५॥

आजिवरि आह्मां होता अभिमान । नेणतां चरणमहिमा तुझा ॥६॥

तुझा पार आह्मी नेणों नारायणा । नखीं गोवर्द्धना राखियेलें ॥७॥

राखियेलें गोकुळ आह्मां सकळांसि । दगडाच्या राशी वरुषतां ॥८॥

वर्णावें तें काय तुझें महिमान । धरिती चरण सकिळक ॥९॥

सकळ ही तान विसरलीं भूक । सकळ ही सुख दिलें त्यांसि ॥१०॥

त्यासि कळों आला वैकुंठनायका। तुका ह्मणे लोक निर्भर ते ॥११॥

लोकां कळों आला देव आह्मांमधीं । टाकिली उपाधि तिहीं शंका ॥१॥

शंका नाहीं थोरां लाहानां जीवांसि । कळला हा हृषीकेशी मग ॥२॥

मग मनीं जाले निर्भर सकळ । संगें लोकपाळ कृष्णाचिया ॥३॥

कृष्णाचिया ओंव्या गाणें गाती गीत । कृष्णमय चित्त जालें त्यांचें ॥४॥

त्यांसि ठावा नाहीं बाहेरिल भाव । अंतरीं च वाव सुख जालें ॥६॥

सुखें तया दीस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥६॥

चिंतनें चि धालीं न लगे अन्नपाणी । तुका ह्मणे मनीं समाधान ॥७॥

समाधान त्यांचीं इंिद्रयें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥१॥

गोविंदाचा जाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काज ॥२॥

काज काम त्यांचें सरले व्यापार । नाहीं आप पर माझें तुझें ॥३॥

माया सकळांची सकळां ही वरी । विषय तें हरि दिसों नेदी ॥४॥

दिसे तया आप परावें सारिखें । तुका ह्मणे सुखें कृष्णाचिया ॥५॥

कृष्णाचिया सुखें भुक नाहीं तान । सदा समाधान सकळांचें ॥१॥

कळलें चि ऩाहीं जाले किती दिस । बाहेरिल वास विसरलीं ॥२॥

विसरु कामाचा तुका ह्मणे जाला । उद्वेग राहिला जावें यावें ॥३॥

This abhang still carries a transcription error we could not repair automatically.

जावें बाहेरी हा नाठवे विचार । नाहीं समाचार ठावा कांहीं ॥१॥

कांहीं न कळे तें कळों आलें देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥

कवतुकासाठीं भक्त देहावरि । आणिताहे हरि बोलावया ॥३॥

यासि नांव रूप नाहीं हा आकार । कळला साचार भक्ता मुखें ॥४॥

मुखें भक्तांचिया बोलतो आपण । अंगसंगें भिन्न नाहीं दोघां ॥५॥

दोघे वेगळाले लेखिल जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥६॥

तयासी घडलीं सकळ ही पापें । भक्तांचिया कोपें निंदा द्वेषें ॥७॥

द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेंवी प्राणां नाश करी ॥८॥

करितां आइके निंदा या संतांची । तया होती ते चि अधःपात ॥९॥

पतन उद्धार संगाचा महिमा । त्यजावें अधमा संत सेवीं ॥१०॥

संतसेवीं जोडे महालाभरासी । तुका ह्मणे यासि नाश नाहीं ॥११॥

नाहीं नाश हरि आठवितां मुखें । जोडतील सुखें सकळ ही ॥१॥

सकळी ही सुखें वोळलीं अंतरीं । मग त्याबाहेरी काय काज ॥२॥

येऊं विसरलीं बाहेरी गोपाळें । तल्लीन सकळें कृष्णसुखें ॥३॥

सुख तें योगियां नाहीं समाधीस । दिलें गाई वत्स पशु जीवां ॥४॥

वारला पाऊस केव्हां नाहीं ठावा । तुका ह्मणे देवावांचूनियां ॥५॥

यांसि समाचार सांगतों सकळा । चलावें गोकुळा ह्मणे देव ॥१॥

देव राखे तया आडलिया काळें । देव सुखफळें देतो दासां ॥२॥

दासां दुःख देखों नेदी आपुलिया । निवारी आलिया न कळतां ॥३॥

नाहीं मेघ येतां जातां देखियेला । धारीं वरुषला शिळांचिये ॥४॥

एवढें भक्तांचें सांकडें अनंता । होय निवारिता तुका ह्मणे ॥५॥

काकुलती एकें पाहाती बाहेरी । तया ह्मणे हरि वोसरला ॥१॥

वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥२॥

कवतुक जालें ते काळीं आनंद । कळला गोविंद साच भावें ॥३॥

भावें तयापुढें नाचती सकळें । गातील मंगळें ओंव्या गीत ॥४॥

गीत गाती ओंव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाती पांवे ॥५॥

वत्सें गाई पशू नाचती आनंदें । वेधलिया छंदें गोविंदाच्या ॥६॥

चित्त वेधियेलें गोविंदें जयाचें । कोण तें दैवाचें तयाहुनि ॥७॥

तयाहुनि कोणी नाहीं भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥८॥

गोविंदाचा संग तुका ह्मणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळींचे ॥९॥

गोकुळींची गती कोण जाणे परि । पाहों आला वरी इंद्रराव ॥१॥

इंद्रापाशीं मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करुनि आलों ॥२॥

आतां जीव नाहीं सांगाया ते रानीं । पुरिलें पाषाणीं शिळाधारीं ॥३॥

रिता कोठें नाहीं राहों दिला ठाव । जल्पती तो भाव न कळतां ॥४॥

न कळतां देव बळें हुंबरती । साच ते पावती अपमान ॥५॥

माव न कळतां केली तोंडपिटी । इंद्र आला दृष्टी पाहावया ॥६॥

पाहतां तें आहे जैसें होतें तैसें । नाचती विशेषें तुका ह्मणे ॥७॥

नाचतां देखिलीं गाई वत्सें जन । विस्मित होऊन इंद्र ठेला ॥१॥

लागला पाऊस शिळांचिये धारीं । वांचलीं हीं परी कैसीं येथें ॥२॥

येथें आहे नारायण संदेह नाहीं । विघ्न केलें ठायीं निर्विघ्न तें ॥३॥

विचारितां उचलिला गोवर्द्धन । अवतार पूर्ण कळों आला ॥४॥

आला गौळियांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचें ॥५॥

त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । न कळे चतुर्मुखा ब्रह्मयासि ॥६॥

सीणतां जो ध्याना न ये एकवेळा । तो तया गोपाळां समागमें ॥७॥

समागमें गाई वत्स पुण्यवंता । देह कुर्वाळितां अंगसंग ॥८॥

संग जाला मायबापां लोकपाळां । आिंळगिती गळा कंठाकंठ ॥९॥

करिते हे जाले स्तुती सकिळक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥१०॥

करितील वृष्टी पुष्पवरुषाव । देवआदिदेव पूजियेला ॥११॥

पुष्पांजुळी मंत्र घोष जयजयकार । दुमदुमी अंबर नेणें नादें ॥१२॥

नामाचे गजर गंधर्वांचीं गाणीं । आनंद भुवनीं न माये तो ॥१३॥

तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळीं देवासी दोहीं ठायीं ॥१४॥

दोहीं ठायीं सुख दिलें नारायणें । गेला दरुषणें वैरभाव ॥१५॥

भावना भेदाची जाय उठाउठी । तुका ह्मणे भेटी गोविंदाचे ॥१६॥

गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव ॥१॥

भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरि ॥२॥

वरि हातबाहे उभारिली देवें । कळलीया भावें सकळांच्या ॥३॥

सकळ ही वरि बहुडविले स्थळा । चलावें गोपाळा ह्मणे घरा ॥४॥

राहिलीं हीं नाचों गोविंदाच्या बोलें । पडिलीया डोलें छंदें हो तीं ॥५॥

छंद तो नावरे आपणा आपला । आनंदाचा आला होता त्यांसि ॥६॥

त्यांच्या तुका ह्मणे आनंदें सकळ । ठेंगणें गोपाळ समागमें ॥७॥

समागमें असे हरि नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसि ॥१॥

अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकिळकां ॥२॥

सकळही जन आले गोकुळासि । आनंद मानसीं सकळांच्या ॥३॥

सकळांचा केला अंगीकार देवें । न कळतां भावें वांचवी त्यां ॥४॥

त्यां जाला निर्धार हरि आह्मांपासीं । निवांत मानसीं निर्भर तीं ॥५॥

निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकिळक नारायणें ॥६॥

नारायण भय येऊं नेदी गांवा । तुका ह्मणे नांवा अनुसरे त्या ॥७॥

ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे ॥१॥

हें सोंग सारिलें या रूपें अनंतें । पुढें हि बहु तें करणें आहे ॥२॥

आहे तुका ह्मणे धर्म संस्थापणें । केला नारायणें अवतार ॥३॥

अवतार केला संहारावे दुष्ट । करिती हे नष्ट परपीडा ॥१॥

परपीडा करी दैत्य कंसराव । पुढें तो ही भाव आरंभिला ॥२॥

लाविलें लाघव पाहोनियां संधी । सकळांही वधी दुष्टजना ॥३॥

दुष्टजन परपीडक जे कोणी । ते या चक्रपाणी न साहति ॥४॥

न साहवे दुःख भक्तांचें या देवा । अवतार घ्यावा लागे रूप ॥५॥

रूप हें चांगलें रामकृष्ण नाम । हरे भवश्रम उच्चारितां ॥६॥

उच्चारितां नाम कंस वैरभावें । हरोनियां जीवें कृष्ण केला ॥७॥

कृष्णरूप त्यासि दिसे अवघें जन । पाहे तों आपण कृष्ण जाला ॥८॥

पाहिलें दर्पणीं आधील मुखासि । चतुर्भुज त्यासि तो चि जाला ॥९॥

जालीं कृष्णरूप कन्या पुत्र भाज । तुका ह्मणे राज्य सैन्य जन ॥१०॥

सैन्य जन हांसे राया जालें काई । वासपे तो ठायीं आपणासि ॥१॥

आपणा आपण जयास तीं तैसीं । वैरभाव ज्यांसि भक्ति नाहीं ॥२॥

नाहीं याचा त्याचा भाव एकविध । ह्मणउनि छंद वेगळाले ॥३॥

वेगळाल्या भावें ती तया हांसती । तयास दिसती अवघीं हरि ॥४॥

हरिला कंसाचा जीव भाव देवें । द्वेषाचिया भावें तुका ह्मणे ॥५॥

द्वेषाचिया ध्यानें हरिरूप जाले । भाव हारपले देहादिक ॥१॥

देहादिक कर्में अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥

नारायण जोडे एकविध भावें । तुका ह्मणे जीवें जाणें लागे ॥३॥

जीवभाव त्याचा गेला अभिमान । ह्मणऊनि जन हांसे कंसा ॥१॥

सावध करितां नये देहावरि । देखोनियां दुरि पळे जन ॥२॥

जन वन हरि जालासे आपण । मग हे लोचन झांकियेले ॥३॥

झांकुनि लोचन मौन्यें चि राहिला । नाहीं आतां बोलायाचें काम ॥४॥

बोलायासि दुजें नाहीं हें उरलें । जन कृष्ण जाले स्वयें रूप ॥५॥

रूप पालटलें गुण नाम याति । तुका ह्मणे भूतीं देव जाला ॥६॥

जालों स्वयें कृष्ण आठव हा चित्तीं । भेद भयवृत्ति उरली आहे ॥१॥

उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥

तोंवरि हा देव नाहीं तयापासीं । आला दिसे त्यासि तो चि देव ॥३॥

देवरूप त्याची दिसे वरी काया । अंतरीं तो भयाभीत भेदें ॥४॥

भेदें तुका ह्मणे अंतरे गोविंद । साचें विण छंद वांयां जाय ॥५॥

वांयां तैसे बोल हरिशीं अंतर । केले होती चार भयभेदें ॥१॥

भेदभय गेलें नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा जाली ॥२॥

जाली भेटी कंसा हरिशीं निकट । सन्मुख चि नीट येरयेरां ॥३॥

येरयेरां भेटी युद्धाच्या प्रसंगीं । त्याचें शस्त्र अंगीं हाणितलें ॥४॥

त्याचें वर्म होतें ठावें या अनंता । तुका ह्मणे सत्तानायक हा ॥५॥

नारायणें कंस चाणूर मदिला । रार्ज्यीं बैसविला उग्रसेन ॥१॥

उग्रसेन स्थापियेला शरणागत । पुरविला अंत अभक्ताचा ॥२॥

अवघें चि केलें कारण अनंतें । आपुलिया हातें सकळ ही ॥३॥

सकळ ही केलीं आपुलीं अंकित । राहे गोपीनाथ मथुरेसि ॥४॥

मथुरेसि आला वैकुंठनायक । जालें सकिळक एक राज्य ॥५॥

राज्य दिलें उग्रसेना शरणागता । सोडविलीं माता पिता दोन्हीं ॥६॥

सोडवणे धांवे भक्ताच्या कैवारें । तुका ह्मणे करें शस्त्र धरी ॥७॥

धरी दोही ठायीं सारखा चि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥१॥

दोन्ही एके ठायीं केल्या नारायणें । वाढविला तिणें आणि व्याली ॥२॥

व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणें मायबापा ॥३॥

माय हा जगाची बाप नारायणा । दुजा करी कोण यत्न यासि ॥४॥

कोण जाणे याचे अंतरींचा भाव । कळों नेदी माव तुका ह्मणे ॥५॥

दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥

हांसे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये पराकृत ह्मणों यासि ॥२॥

यासि कळावया एक भक्तिभाव । दुजा नाहीं ठाव धांडोळितां ॥३॥

धांडोळितां श्रुति राहिल्या निश्चित । तो करी संकेत गोपींसवें ॥४॥

गोपिकांची वाट पाहे द्रुमातळीं । मागुता न्याहाळी न देखतां ॥५॥

न देखतां त्यांसि उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळां ॥६॥

वेळोवेळां पंथ पाहे गोपिकांचा । तुका ह्मणे वाचा नातुडे तो ॥७॥

तो बोले कोमळ निष्ठ‍ साहोनि । कोपतां गौळणी हास्य करी ॥१॥

करावया दास्य भक्तांचें निर्लज्ज । कवतुकें रज माथां वंदी ॥२॥

दिलें उग्रसेना मथुरेचें राज्य । सांगितलें काज करी त्याचें ॥३॥

त्यासि होतां कांहीं अरिष्टनिर्माण । निवारी आपण शरणागता ॥४॥

शरणागतां राखे सर्व भावें हरि । अवतार धरी तयांसाटीं ॥५॥

तयांसाटीं वाहे सुदर्शन गदा । उभा आहे सदा सांभाळित ॥६॥

तळमळ नाहीं तुका ह्मणे चित्ता । भक्तांचा अनंता भार माथां ॥७॥

मारिले असुर दाटले मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥१॥

ते हा नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥२॥

वरिले ते दूतीं यमाचिया दंडीं । नुच्चरितां तोंडीं नारायण ॥३॥

नारायण नाम नावडे जयासि । ते जाले मिरासी कुंभपाकीं ॥४॥

कुंभपाकीं सेल मान तो तयांचा । तुका ह्मणे वाचा संतनिंदा ॥५॥

वास नारायणें केला मथुरेसि । वधूनि दुष्टांसि तये ठायीं ॥१॥

ठायीं पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळ जनांसहित लोकां ॥२॥

लोकां दुःख नाहीं मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांणीं ॥३॥

देखोनियां देवा विसरलीं कंसा । ठावा नाहीं ऐसा होता येथें ॥४॥

येथें दुजा कोणी नाहीं कृष्णाविणें । ऐसें वाटे मनें काया वाचा ॥५॥

काया वाचा मन कृष्णीं रत जालें । सकळां लागलें कृष्णध्यान ॥६॥

ध्यान गोविंदाचें लागलें या लोकां । निर्भर हे तुका ह्मणे चित्तीं ॥७॥

चिंतले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥१॥

वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥२॥

चाळविले डंबें एक अहंकारें । भोग जन्मांतरें न चुकती ॥३॥

न चुकती भोग तपें दानें व्रतें । एका त्या अनंतेंवांचूनियां ॥४॥

चुकवुनि जन्म देईल आपणा । भजा नारायणा तुका ह्मणे ॥५॥

भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्तीं हेवा दुजा कांहीं ॥१॥

दुजा छंदु नाहीं तयांचिये मनीं । जागृति सपनीं कृष्णध्यान ॥२॥

ध्यान ज्यां हरीचें हरीसि तयांचें । चित्त ग्वाही ज्यांचें तैशा भावें ॥३॥

भाग्यें पूर्वपुण्यें आठविती लोक । अवघे सकिळक मथुरेचे ॥४॥

मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथें नारायण राज्य करी ॥५॥

राज्य करी गोपीयादवांसहित । कर्मिलें बहुतकाळ तेथें ॥६॥

तेथें दैत्यीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका ह्मणे ॥७॥

रचियेला गांव सागराचे पोटीं । जडोनि गोमटीं नानारत्नें ॥१॥

रत्न खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति रविकळा ॥२॥

कळा सकळ ही गोविंदाचे हातीं । मंदिरें निगुतीं उभारिलीं ॥३॥

उभारिलीं दुगॉ दारवंठे फांजी । कोटी चर्या माजी शोभलिया ॥४॥

शोभलें उत्तम गांव सागरांत । सकळांसहित आले हरि ॥५॥

आला नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणि ॥६॥

निवडीना याति समान चि केलीं । टणक धाकुलीं नारायणें ॥७॥

सकळ ही धर्मशीळ पुण्यवंत । पवित्र विरक्त नारीनर ॥९॥

रचिलें तें देवें न मोडे कवणा । बिळयांचा राणा नारायण ॥१०॥

बळबुद्धीनें तीं देवा च सारिखीं । तुका ह्मणे मुखीं गाती ओंव्या ॥११॥

नारायणें दिलीं अक्षई मंदिरें । अभंग साचारें सकळांसि॥८

गाती ओंव्या कामें करितां सकळें । हालवितां बाळें देवावरि ॥१॥

ॠिद्धसिद्धी दासी दारीं ओळंगती । सकळ संपित्त सर्वां घरीं ॥२॥

घरीं बैसलिया जोडलें निधान । करिती कीर्त्तन नरनारी ॥३॥

नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयांसि संगति गोविंदाची ॥४॥

गोविंदें गोविंद केले लोकपाळ । चिंतनें सकळ तुका ह्मणे ॥५॥

कांहीं चिंता कोणा नाहीं कोणेविशीं । करी द्वारकेसि राज्य देव ॥१॥

द्वारकेसि राज्य करी नारायण । दुष्ट संहारून धर्म पाळी ॥२॥

पाळी वेदआज्ञा ब्राह्मणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचें ॥३॥

अतीत अलिप्त अवघियां वेगळा । नाहीं हा गोपाळा अभिमान ॥४॥

अभिमान नाहीं तुका ह्मणे त्यासि । नेदी आणिकांसि धरूं देव ॥५॥

धरियेलें रूप कृष्ण नाम बुंथी । परब्रह्म िक्षती उतरलें ॥१॥

उत्तम हें नाम राम कृष्ण जगीं । तरावयालागीं भवनदी ॥२॥

दिनानाथिब्रदें रुळती चरणी । वंदितील मुनि देव ॠषि ॥३॥

ॠषीं मुनीं भेटी दिली नारायणें । आणीक कारणें बहु केलीं ॥४॥

बहु कासावीस जाला भक्तांसाटीं । तुका ह्मणे आटी सोसियेली ॥५॥

सोसियेला आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥१॥

वाहोनि सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥२॥

नेदी काळाचिये हातीं सेवकांसि । तुका ह्मणे ऐसी िब्रदावळी ॥३॥

िब्रदावळी ज्याचे रुळते चरणीं । पाउलें मेदिनी सुखावे त्या ॥१॥

सुखावे मेदिनी कृष्णाचिये चालीं । कुंकुमें शोभलीं होय रेखा ॥२॥

होउनि भ्रमर पाउलांचें सुख । घेती भक्त मुख लावूनियां ॥३॥

याचसाटीं धरियेला अवतार । सुख दिलें फार निजदासां ॥४॥

निज सुख तुका ह्मणे भक्तां ठावें । तींहीं च जाणावें भोगूं त्यासि ॥५॥

भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणीगोपाळां गाईवत्सां ॥१॥

गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरि ॥२॥

भक्ति नवविधा तयांसि घडली । अवघीं च केली कृष्णरूप ॥३॥

रूप दाखविलें होतां भिन्न भाव । भक्त आणि देव भिन्न नाहीं ॥४॥

नाहीं राहों दिलें जातां निजधामा । तुका ह्मणे आह्मांसहित गेला ॥५॥

गेला कोठें होता कोठुनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥१॥

आहे साच भावें सकळव्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥२॥

कोठे नाहीं ऐसा नाहीं रिता ठाव । अनुभवी देव स्वयें जालें ॥३॥

जातों येतों आह्मी देवाचे सांगांतें । तुका ह्मणे गात देवनाम ॥४॥

मना वाटे तैसीं बोलिलों वचनें । केली धिटपणें सलगी देवा ॥१॥

वाणी नाहीं शुद्ध याति एक ठाव । भक्ति नेणें भाव नाहीं मनीं ॥२॥

नाहीं जालें ज्ञान पाहिलें अक्षर । मानी जैसें थोर थोरी नाहीं ॥३॥

नाहीं मनीं लाज धरिली आशंका । नाहीं भ्यालों लोकां चतुरांसि ॥४॥

चतुरांच्या राया मी तुझें अंकित । जालों शरणागत देवदेवा ॥५॥

देवा आतां करीं सरतीं हीं वचनें । तुझ्या कृपादानें बोलिलों तीं ॥६॥

तुझें देणें तुझ्या समर्पूनि पायीं । जालों उतरायी पांडुरंगा ॥७॥

रंकाहुनि रंक दास मी दासांचें । सामर्थ्य हें कैचें बोलावया ॥८॥

बोलावया पुरे वाचा माझी कायी। तुका ह्मणे पायीं ठाव द्यावा ॥९॥

चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूर्ति विठोबाची ॥१॥

चहुंयुगांचें हें साधन साधिलें । अनुभवा आलें आपुलिया ॥२॥

एवढें करूनि आपण निराळा । प्रत्यक्ष डोळां दाखविलें ॥३॥

दावुनि सकळ प्रमाणाच्या युक्ति । जयजयकार करिती अवघे भक्त ॥४॥

भक्ति नवविधा पावली मुळची । जनार्दननामाची संख्या जाली ॥५॥

नवसें ओंव्या आदरें वाचितां । त्याच्या मनोरथा कार्यसिद्धि ॥६॥

सीमा न करवे आणीक ही सुखा। तुका ह्मणे देखा पांडुरंगा ॥७॥

Text: तुकाराम गाथा on Marathi Wikisource, which does not name the printed edition it was transcribed from. The verses are public domain; the transcription is by Wikisource contributors, CC BY-SA 4.0. Its systematic legacy-font errors are repaired by rule (see the reading page for details); some remain — इप printed for ई in about 220 abhangas, and a few vowel signs on the wrong letter. Numbering follows Wikisource; printed editions differ. Spotted a wrong line? Write to us with the number.

If you need to talk to someone now: Tele-MANAS 14416 (free, 24×7) · Vandrevala +91 99996 66555 (24×7, call or WhatsApp) · AASRA 022 2754 6669 (24×7) · iCall 9152 987 821 (Mon–Sat, 8am–9pm) · Emergency 112